देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरानं ओलांडला ८९ टक्क्यांचा टप्पा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या दरानं ८९ टक्क्यांचा टप्पा पार केला असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशभरात ७९ हजारापेक्षा जास्त रूग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
देशात आतापर्यंत ६८ लाख ७४ हजार रूग्ण या आजारातून बरे झाले असून सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या नोंद झालेल्या एकूण रूग्णसंख्येच्या केवळ ९ पूर्णांक २९ शतांश टक्के इतकी असल्याचं यात म्हटलं आहे.
गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या ५५ हजार ८३८ नव्या रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णसंख्या ७७ लाखाच्या पुढे गेली आहे, तर सध्या ७ लाख १५ हजार रूग्ण विविध रूग्णालयांमधे उपचार घेत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
दहा लाख रूग्णांमागे सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या असलेल्या देशांमधे भारताचं स्थान कायम असून, चाचणी-तपास आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त, तर मृत्युदर कमी राखण्यात आपल्याला आपल्याला यश मिळत आहे, असं यात म्हटलं आहे.
देशात आतापर्यंत नऊ कोटी ८६ लाख कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.