राज्यात आणि देशात सर्वत्र होतेय ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद-ए –मिलाद-उन-नबी साजरी होत आहे. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुह्म्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए–मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी ठिकठिकाणी जुलूस काढला जातो. तसंच मशिदींमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलूस तसेच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे. पैगंम्बर मोहम्मद यांचे जीवन आणि शिकवण या संदर्भात ऑनलाइन सीरत कॉन्फरन्स तसेच मीलाद मैफिलीच आयोजन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद-उन-नबी नागपुरात साधेपणाने साजरी करण्यात आली. मरकझी सीरातुणबी कमेटिच्या वतीने दरवर्षी जूलूस काढण्यात येतो, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूलूस न काढता एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित महंमद यांनी प्रेम आणि बंधुतेचा संदेश देत जगाला मानवतेचा मार्ग दाखवला. त्यांना समानता आणि सौहार्द या आधारावरील समाजाची निर्मिती करायची होती, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
प्रेषित महंमद यांनी पवित्र कुराणात सांगितलेल्या शिकवणीनुसार, प्रत्येकाने समाजाच्या भल्यासाठी काम करावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. या सणामुळे करुणा आणि बंधुभाव अधिक वाढीला लागेल, असे मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा हा जन्मदिवस त्यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण समाजात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचा संदेश घेऊन जाईल आणि मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करत असताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे, सुरक्षित अंतर पालन करून स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.