Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.  म्हाप्रळ – आंबेत पुलावरील वाहतुकीस पर्याय देणाऱ्या फेरीबोटीच्या जेटीचे कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते म्हाप्रळ येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सावित्री नदीवरील म्हाप्रळ – आंबेत पुल नादुरुस्त झाल्याने सध्या अवजड वाहतुकीस बंद आहे. पुलाचे सदृढीकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरिकांची पुलाअभावी मोठी अडचण होणार ही बाब लक्षात घेतल्याने पुलाचे काम सुरु असतानच तात्काळ उपाययोजना म्हणून म्हाप्रळ आंबेत फेरी बोट सुरु करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने  पाहणी करुन बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्यकता व्यक्त केली होती. ग्रामस्थांची ही मागणी मान्य होऊन जेटीसाठी निधीची तरतूद झाल्याने  श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार योगेश कदम, पंचायत समिती सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तसेच शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version