मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातला ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी कोल्हापुर इथं काल साखर कारखाना आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात महत्वपूर्ण संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तोडणीप्रमाणेच ऊस दरामध्येही १४ टक्के वाढ मिळावी, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला साखर कारखानदारांनी नकार दर्शवल्यामुळे बैठकीची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. मात्र स्वाभिमानीनं मांडलेल्या एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीवर सर्वच कारखानदार राजी झाले.
केंद्र सरकारनं यापूर्वीच एफआरपीमध्ये वाढ केली असून आता साखरेची किंमतही वाढवावी या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा द्यावा असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. केंद्राकडे याबाबत एकत्रीत पाठपुरावा करून साखरेला जास्त दर मिळवून देऊ, असं पाटील यावेळी म्हणाले.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून मागण्या मान्य झाल्या नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांनी दिला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी.एन. पाटील, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील यांच्यासह अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कारखानदार प्रतिनिधी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाभिमानीचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहत बैठकीतून बाहेर पडले आणि उद्या होणाऱ्या ऊस परिषदेत हा मुद्दा उचलून धरणार असून जर मागण्या मान्य केल्या नाही तर एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशाराही संघटनेनं दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रुग्णालयात दाखल असल्यानं पहिल्यांदाच त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली.