नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. सदस्यांनी हौदयात उतरु नये, घोषणाबाजी करु नये, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणू नये तसेच कागदपत्रे फाडू नयेत आणि त्यांना सभागृहात भिरकावण्यासारखी अनुचित कृत्ये करु नयेत असे नियम आचारसंहितेत समाविष्ट करावेत अशी सूचना नायडू यांनी केली आहे.
राज्यसभेचे वरिष्ठ अधिकारी आणि उपराष्ट्रपती भवनातील प्रसार माध्यम कर्मचारी यांच्यासाठी उपराष्ट्रपतींनी विशेष भोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात झालेल्या फलदायी कामकाजाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. या अधिवेशनात राज्यसभेच्या 35 बैठकांमध्ये 32 विधेयकं संमत झाली. गेल्या 17 वर्षात आपण पाहिलेले हे सर्वोत्तम कामकाज असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांनी आणि नेत्यांनी या कामकाजाचे महत्व लक्षात घेतल्याचे आणि यापुढच्या काळात ही सकारात्मक वाटचाल ते पुढे सुरु ठेवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संसदेमध्ये आणि कायदेमंडळांमध्ये कामकाजात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, गोंधळ होऊ नये यासाठी सदस्यांनी दक्ष राहिले पाहिजे. त्यांनी चर्चा, वाद विवाद यावर भर दिला पाहिजे.
सभागृहातल्या व्यत्ययांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरु लागली आहे असा इशारा त्यांनी दिला. संसदेचे आणि कायदेमंडळाचे कामकाज प्रभावी पद्धतीने चालेल आणि त्यामध्ये उच्च दर्जाचे संवाद होतील याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.