Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयआयटी मुंबईचा 57 वा दीक्षांत सोहळा संपन्न

मुंबई : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) 57 वा दीक्षांत  सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक ‘ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले.

शिक्षणाच्या अस्त्राचा वापर करून विद्यार्थी आपल्या तसेच कुटुंबाच्या आणि समाज जीवनात परिवर्तन घडवू शकतात असे त्यांनी  आपल्या भाषणात सांगितले. पदवीदान सोहळा हा महत्वपूर्ण प्रसंग असून यानंतर विद्यार्थी शिक्षणाची फळे बाहेरील जगापर्यंत पोहचवण्याच्या प्रवासाला निघतात असे ते म्हणाले. संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घालायला हवी जेणेकरून त्या व्यक्तीला विकासासाठी मजबूत पाया  उपलब्ध होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढल्या पाच वर्षात भारताला शिक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे निशांक यावेळी म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यात आयआयटी संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतात असे ते म्हणाले. जगात जिथे कुठे अंधार असेल तिथे प्रकाश घेऊन जा . स्वप्ने पहा आणि आपली स्वप्ने साकारण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण सार्थकी लावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत अव्वल २०० मध्ये स्थान मिळवल्याबद्दल त्यांनी आयआयटी मुंबईचे अभिनंदन केले. त्यांनी उपस्थितांना मोठी उद्दिष्ट्ये आखण्याचे आवाहन केले. हवामान बदल समस्या सोडवण्यात तसेच भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्यासारखी विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात आयआयटी मुंबई उल्लेखनीय योगदान देऊ शकते असे ते म्हणाले.

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टॅन्ड अप इंडिया सारख्या कार्यक्रमांचा उल्लेख करून ते म्हणाले की या परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजना आहेत . भारत आता जगातील पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनला आहे असे ते म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या जन्मदिनी दरवर्षी एक रोपटे लावण्याचे जल संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी त्यांनी हॉस्टेल क्र . १८ चे उदघाटन केले आणि आयआयटी संकुलात वृक्षारोपण केले. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी सर्व आयआयटींच्या विद्यार्थ्यांशी ‘नवभारत का निर्माण, आयआयटी के साथ ‘ या विषयावर थेट संवाद साधला.जगाला ज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात नेतृत्व पुरवण्याची भारताची परंपरा आहे असे ते म्हणाले. ‘वसुधैव कुटुंबकम ‘ या तत्वज्ञानामुळे भारत विविध देशांच्या मांदियाळीत वेगळा ठरतो असे ते म्हणाले. गणित, औषध, आणि अणु विज्ञान क्षेत्रात प्राचीन भारताच्या योगदानाची त्यांनी आठवण करून दिली. नवभारताच्या विकासात योगदान देण्याचे आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावर्षी पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 301* पीएचडी, 27* दुहेरी पदवी (MTech/MPhil+PhD) आणि  35* दुहेरी पदवी (MSc+PhD).विद्यार्थी आहेत. यापैकी 38 संशोधक विद्यार्थ्यांची 2017-19 वर्षासाठी पीएचडी संशोधनात सर्वोतकृष्ट म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय  23 संयुक्त पीएचडी पदव्या मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने प्रदान करण्यात आल्या, कुलगुरू आणि मोनाश विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांनी हे पुरस्कार प्रदान केले.

याशिवाय 12 एमएस (संशोधन) ,  6 दुहेरी पदव्या (MSc+MTech), 576 एमटेक , 56

एमडी ,27 एमफिल , 110 MMgt, 226 दोन-वर्षे एमएस्सी  पदव्याही प्रदान करण्यात आल्या.

2018-19 वर्षासाठी संस्थेचा अहवाल सादर करताना आयआयटी मुंबईचे संचालक  प्रा. सुभाषिश चौधरी म्हणाले की पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आयआयटी मुंबई हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. देशातील 23बआयआयटी मध्ये जेईई 2019 मधील अव्वल 50 पैकी  47 तर 100 पैकी 63 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला आहे असे ते म्हणाले. आयआयटी मुंबईत मिळणारे शिक्षण हे जागतिक दर्जाचे असून नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात असे ते म्हणाले.

यावर्षी 4 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी श्रीवत्सन श्रीधर याला राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले. शशांक ओबला याला ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल ‘ (2017-18)’तर रिभू भट्टाचार्य याला (2018-19)’ साठी

‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल ‘ देण्यात आले. डॉ . शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक धृती शाह हिला प्रदान करण्यात आले.

इन्फोसिस टेकनॉलॉजी लि . चे सह संस्थापक  आणि अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष नंदन निलेकणी याना सामाजिक विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

ही पदवी आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे नंदन निलेकणी म्हणाले. आयआयटी मुंबईत व्यतीत केलेली पाच वर्षे हा खूप मोठा अनुभव होता असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने विकास समस्या सोडवता येतात याचा अनुभव इन्फोसिस आणि आधार प्रकल्पावर काम करताना आला असे ते म्हणाले.

मोनाश विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलगुरु प्रा. मार्गारेट गार्डनर, प्रशासक मंडळाचे सदस्य, आणि देश-विदेशातील अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version