मुंबई (वृत्तसंस्था): रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातले कावीर इथले रहिवाशी आणि वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी मुंबईत अटक केली, असून त्यांना अलिबागला नेण्यात आले आहे.
मे २०१८ रोजी अन्वय आणि कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी अर्नब गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, पण या गुन्ह्याचा योग्य तपास झालेला नसल्याने, हे प्रकरण सीआयडीकडे द्यावे अशी मागणी नाईक कुटुंबियांनी केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, आज पहाटे गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोस्वामी यांच्या अटकेचा भाजपाने निषेध केला आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. तर, ही घटना आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचे सांगत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी, एका ट्वीट संदेशातून या कारवाईवर टीका करत, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन आणीबाणीचे समर्थन करणाऱ्या मानसिकतेचे दर्शन घडवत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणतीही कारवाई सूड वृत्तीने करत नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही, असे सांगत त्यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे.