Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मोबाईल टॉर्चच्या उजेडात ‘अंत्यसंस्कार’, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार..!

पिंपरी: निगडी अमरधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यविधीच्या ठिकाणी पथदिवे नसल्याने, तेथे अंत्यविधीच्यासाठी येणाऱ्या नागरीकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माणसाच्या जीवनाची फरफट त्याच्या मृत्यूनंतरही कशी सुरूच असते, याचा प्रत्यय निगडी येथील स्मशानभुमीत येत आहे. बिजलीनगर, प्राधिकरण, रूपीनगर निगडी, त्रिवेणीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी निगडी स्मशानभूमीत येत असतात. सायंकाळनंतर करण्यात येणाऱ्या प्रत्येक अंत्यविधी वेळी त्या ठिकाणी येणाऱ्या नागरीकांना पथदिवे नसल्याने, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणल्यावर मृतांच्या नातेवाइकांना काळोखातच धडपड करावी लागते. अक्षरशः मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.

ज्या कुटुंबात अशी दुर्दैवी घटना घडते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार अंधारात करण्याची वेळ आली, तर त्यांच्या भावना काय असतील, याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. मात्र महापालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. असा आरोप दिपक खैरनार यांनी केला आहे.

Exit mobile version