अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करावी – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
Ekach Dheya
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह विविध अन्नपदार्थातील भेसळ रोखण्याचे आणि खाद्य तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई चे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.
मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. भेसळ विरोधातील मोहीम अधिक तीव्र करताना भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.
दिवाळी पार्श्वभूमीवर खवा (मावा), पनीर, खाद्यतेल, मिठाईसह विविध अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती तसेच भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर छापे टाकून कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिले, प्रसंगी त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार खाद्यतेलाचे पॅकिंग करण्यासाठी एकदा वापरलेल्या डब्यांचा पुनर्वापर करण्यास प्रतिबंध आहे. राज्यात अशाप्रकारे डब्यांचा पुनर्वापर होत असल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहआयुक्त शैलेश आढाव, बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, कोकण विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त महेश चौधरी, अमरावती विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, बृहन्मुंबई विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग नलावडे आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे आदी अधिकारी उपस्थित होते.