पुणे : पुणे विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या केंद्राला भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या. यावेळी पुरवठा शाखेच्या उपायुक्त तथा मदत कक्षाच्या समन्वयक नीलिमा धायगुडे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे उपस्थित होत्या.
सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये तसेच वैयक्तिक स्वरुपात या मदत कक्षात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स तसेच काडीपेटी बॉक्स प्राप्त झाले आहेत. संकलित झालेल्या पाण्याच्या बाटल्या व बिस्किटचे पुडे आदी साहित्य वाहनांमध्ये भरून ही वाहने तात्काळ कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना करावीत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.