Site icon साप्ताहिक एकच ध्येय

येत्या २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली. या वर्गांमधली मुलं मोठी असल्यानं सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदी नियम पाळले जातील. विद्यार्थी संख्येबाबत नियंत्रण करणं शक्य होईल, असं त्या म्हणाल्या.

अकरावीच्या प्रवेशाबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचे महाधिवक्ता आणि विधी विभागाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागानं मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. यावर आज निर्णय होण्याची शक्यता असून, निर्णयानंतर तीन दिवसांनी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्याची विभागाची तयारी असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नसल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कोविडच्या सद्यस्थितीमुळे मे महिन्यापूर्वी परीक्षा घेता  येणार नाही, तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने असल्यानं या काळात परिक्षा घेतली तर कोकणासह ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मे महिन्यात परीक्षा घेण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत. तसंच त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आमचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Exit mobile version