नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :मी आणि कमला हॅरीसवर अमेरिकी जनतेनं दाखवलेला विश्वास हा माझा सन्मान आहे, आणि त्यामुळे मी आणखी नम्र झालो आहे. अमेरिकी जनतेच्या हृदयात लोकशाही खोलवर रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रीया अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नीवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त केली.
बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी बाजी मारली. बायडेन यांना 273 प्रतिनिधी मतं मिळाली, तर ट्रम्प यांना 214 मतं मिळाली. सगळ्या जगाची उत्कंठा शिगेला पोचवणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार काल सकाळी साडेअकरा वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आले.
उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरीस या अमेरिकी इतिहासातल्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील.बायडन यांनी ही निवडणूक अवैध मार्गानं जिंकली असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला , आणि न्यायालयात जाण्याचं सुतोवाच केलं आहे. बायडन आणि हॅरीस हे 20 जानेवारीला शपथ ग्रहण करतील. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन आणि कमला हॅरीस यांचं अभिनंदन केलं आहे.