पुणे : स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते सकाळी ठीक 7:30 वाजता नुतन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे व सकाळी ठीक 8 वाजता शनिवार वाडा येथे ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे.
तसेच त्याच दिवशी व मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) पुणे येथे सकाळी ठीक 9.05 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासही सर्वांनी उपस्थित राहून उत्साहाने समारंभ साजरा करणे कामी सहकार्य करावे. जास्तीत जास्त व्यक्तींना मुख्य शासकीय समारंभास भाग घेता यावा यासाठी गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास असा समारंभ साजरा करावा असे वाटले तर त्यांनी त्या दिवशी सकाळी 8:35 पुर्वी किंवा 9.35 नंतर आयोजित करावा.
ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाखात यावे उपस्थितांनी योग्य त्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी आणि इतरांनी दक्षतेने ओळीत उभे राहावे. सर्व शासकीय विभाग व शाळा प्रमुखांनी या सूचनांचे कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे निदर्शनास आणून देऊन त्याचे कटाक्षाने पालन करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकान्वये कळविले आहे.