सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. घरात धान्य नाही, साहित्य नाही अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की,पूरग्रस्तांना शासनाकडून ग्रामीण भागासाठी 10हजार रुपये आणि शहरी भागासाठी 15 हजार रुपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तसेच स्थलांतरितांना प्रति दिनी प्रति व्यक्ती प्रौढांसाठी 60 रुपये आणि मुलांसाठी 45 रुपये दैनिक भत्ता दिला जाणार आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर मंगळवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत. पडलेल्या घरांचेही पंचनामे सुरू आहेत. तसेच मातीच्या घरांमध्ये पाणी शिरले असेल तर त्याचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
मातीची घरे पाणी शिरल्याने लगेच कोसळत नाहीत. पण, नंतर ती कोसळतात. त्यावेळी पाऊस नसेल तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा घरांचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन नंतर जरी घर कोसळले तर त्याची नुकसान भरपाई देण्याविषयी कार्यवाही करता येईल, शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी करता येईल,याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना
यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. कुडाळ तालुक्यातील सरंबळ, आकेरी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पैकी गोठवेवाडी, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे यासह अनेक भागात डोंगर खचत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर करावे असे आवाहन केले.
भूगर्भ शास्त्रज्ञांना याविषयीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. त्या पद्धतीने पाहणी सुरू असून कोणती उपाययोजना करता येईल याविषयी अहवाल तयार करण्यात येत आहे. पण,अशा भागातील रहिवाशांनी स्थलांतर करावे. कायमस्वरुपी स्थलांतरासाठी जागा त्यांनी सांगावी. त्याठिकाणी त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल.
पुन्हा भात लावणीसाठी प्रयत्न करणार
अतिवृष्टीमुळे मुख्यतः भात पिकाचे नुकसान झाले आहे. पण, अजून वेळ गेलेली नाही. ज्याठिकाणी पुन्हा भाताची लावणी करणे शक्य आहे त्याठिकाणी लावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भात लावणीसाठी कृषि यांत्रिकीकरणातून यंत्रांचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन तसे ठराव पाठवावेत. तसेच चांदा ते बांदा योजनेतून कुक्कुट पालनासाठी,गायी पालनासाठीच अनुदान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गोव्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन उभारणार
आपत्तीप्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी, त्यांची सुटका व्हावी यासाठी गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येईल. गोव्यात एका टीममागे एक 307 आणि 407 गाडी असते. त्यामध्ये त्यांची एक नाव असते. त्याप्रमाणेच जिल्ह्यातही आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून तेरा पोलीस स्थानकांना एक नाव, एक 407 आणि एक 307 गाडी पुरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुरासारख्या आपत्तीप्रसंगी पोलिसांची नाव वापरून पुरात अडकलेल्या लोकांना ताबडतोब बाहेर काढता येईल. तसेच ग्रामस्थांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्यात येतील, असेही श्री. केसरकर म्हणाले.
यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावाला भेट दिली. तसेच केळूस येथील तुळाजी तांडेल यांचे घर पाण्यात होते त्यांच्या घरालाही भेट देऊन पाहणी केली,चेंदवण येथील 92 कुटुंबे स्थलांतरीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धिर दिला. दोडामार्ग तालुक्यातील सासोली हेदूस यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तर तिलारीच्या कालव्यात कोसळलेल्या दरडीची, वाहून गेलेल्या केळी बागायतीची व श्री धवसकर यांच्या भात शेतीची पाहणी केली.
एनडीआरएफच्या जवानांचे मानले आभार
दोडामार्ग तहसील कार्यालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील पूरपरिस्थिती वेळी लोकांना वाचवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. यावेळी खासदार विनायक राऊत, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. एनडीआरएफचे इन्स्पेक्टर पितांबरे पराग यांना पुष्पगुच्छ देऊन व जवानांना पुष्प देऊन त्यांचे आभार मानले.