Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशातील 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोविड-19 आजारातून बरे झालेल्या देशातील रुग्णांची संख्या आता 80 लाखांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये दिली आहे.

सध्या उपचार सुरू असलेल्या देशभरातील रुग्णांची संख्या 4 लाख 94 हजार सहाशे 57 असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 5 पूर्णांक 37 शतांश टक्के आहे. गेल्या 24 तासात देशात 44 हजार दोनशे 81 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 86 लाखांवर गेली आहे, वेळेवर तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा नियोजनबद्ध पद्धतीनं अवलंब केला जात असल्यानं देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून मृत्यूदर कमी होत आहे, असं मंत्रालयानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या आजारामुळे गेल्या 24 तासांत देशात 512 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड-19 मुळे देशभरातील आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 1 लाख 27 हजार पाचशे 71 वर गेली आहे. देशाचा मृत्यूदर सध्या 1 पूर्णांक 48 शतांश टक्के असून तो जगातील विविध देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत देशात 11 लाख 53 हजार कोविड-19 तपासणी चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे देशात आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणी चाचण्यांची संख्या 12 लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आरनं ट्वीटरवर दिली आहे.

Exit mobile version