नवी दिल्ली : इसरोचे संस्थापक जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मशताब्दी सोहळ्याला अहमदाबाद येथे प्रारंभ झाला. इसरो , अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभागाचे अधिकारी आणि साराभाई कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले.
नरेंद्र मोदी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणाले कि ‘विक्रम’ लैंडर जेव्हा चंद्रावर उतरेल तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या वतीने डॉ. साराभाई यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. विक्रम साराभाई यांच्या विचारांमुळॆच भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक शक्तिशाली देश बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. डॉ. होमी भाभा यांच्या निधनाने भारतीय विज्ञान जगतात एक पोकळी निर्माण झाली होती. त्याकाळी विक्रम साराभाई यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्व क्षमतेच्या जोरावर विज्ञानाला नवा आयाम दिला असे मोदी म्हणाले.
डॉ. विक्रम साराभाई हे विज्ञान क्षेत्रातील एक समर्पित योद्धा होते असे सांगून मोदी म्हणाले कि त्यांनी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेला देखील प्रोत्साहन दिले. त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेळ काढला. डॉ. विक्रम साराभाई आपल्यासाठी एक अमूल्य वारसा सोडून गेले आहेत आणि हा वारसा लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे असे मोदी म्हणाले. इसरोने सुरु केलेल्या ऑनलाईन अंतराळ प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना केले.
इसरोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी डॉ. विक्रम साराभाई यांचे वर्णन एक महान संस्था निर्माता असे केले. विक्रम साराभाई यांनी आधुनिक विज्ञान, भौतिक संशोधन आणि अणुऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये संस्था स्थापन करून आधुनिक भारताच्या निर्मितीत खूप मोठे योगदान दिल्याचे ते म्हणाले. विक्रम साराभाई द्वारा स्थापित संस्था आज सर्वोत्कृष्ट केंद्र बनल्याचे ते म्हणाले.
उद्घाटन कार्यक्रमदरम्यान डॉ. विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित एक अल्बम, इसरोवरील एक कॉफी टेबल बुक आणि अणुऊर्जा विभागाकडून साराभाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक नाणे प्रकाशित करण्यात आले. यावेळी एका बसमध्ये ‘स्पेस ऑन व्हील्स’ प्रदर्शनाचे उदघाटन देखील करण्यात आले .
वर्षभर चालणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई जन्मशताब्दी कार्यक्रमात प्रदर्शने , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, पत्रकारिता पुरस्कार आणि प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने यांचा समावेश आहे. आजपासून सुरु झालेला हा कार्यक्रम देशभरातील निवडक 100 शहरांमध्ये होणार असून 12 ऑगस्ट 2020 रोजी तिरुवनंतपुरम येथे त्याची सांगता होईल.
विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे माजी संचालक डॉ. बी. एन. सुरेश, अंतराळ प्रयोग केंद्राचे माजी संचालक आणि डॉ. साराभाई यांचे निकटचे सहकारी प्रमोद काळे , इसरोचे माजी अध्यक्ष डॉ. कस्तूरीरंगन, परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष के. एन. व्यास, परमाणु ऊर्जा विभागाचे माजी अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासन आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे सुपुत्र डॉ. कार्तिकेय साराभाई यावेळी उपस्थित होते.