आयुष विभागीय कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
Ekach Dheya
पुणे- सहायक संचालक (आयुष) यांच्या विभागीय कार्यालयात उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत व सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्र.द.सोमवंशी, अंजली कांबळे, अशोक शेगर, जगदीश कुलकर्णी, रणजित ढेरे
पंचाक्षरी पाटील, राजू मोहोळ, सुनील भोसले हे उपस्थित होते. उपसंचालक सरग यांनी ‘कोविड-19 महामारीसाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर आधारित विचार व्यक्त केले. कोरोना किंवा कोविड-19 वर अजूनही लस सापडलेली नाही, तथापि, खबरदारी आणि गरजेनुसार आयुर्वेद उपचार पध्दती यामुळे या आजारापासून मुक्तता मिळवता येवू शकते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि कोरोनापासून बचाव करणे याचा अवलंब करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुर्वेद ही उपचार पध्दती मुळापासून रोग नष्ट करणारी असल्याने तिचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे.
सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विशद केले. आयुर्वेदीक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध योजना मांडल्या तसेच निरोगी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहार आदी बाबींचा अवलंब करावा, असे सांगितले. प्रारंभी राजेंद्र सरग यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. प्र.द.सोमवंशी यांनी आयुष विभागाच्या कार्याची माहिती दिली. अशोक शेगर यांनी सूत्रसंचालन तर जगदीश कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.