Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संसदेच्या आजी माजी सदस्यांनी केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज एकशे एकतीसावी जयंती. नेहरु यांची जयंती देशभर बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त संसदभवनात नेहरु यांना आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसेभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक आजी माजी सदस्यांनी संसदेच्या केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शांतीवन इथं नेहरु यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली. नेहरु यांनी बंधुत्व, समानता आणि आधुनिक मुल्यांच्या आधारानं भारताच्या जडणघडणीचा पाया रचला असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

हसत खेळत शिकत जगुया आणि आपल्यातलं लहान मुल जिवंत ठेवूया अशा शब्दात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन केलं आहे, तसंच बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहरु यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत दिलेलं योगदान खूप मोठं आहे असं पवार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही नेहरु यांना अभिवादन केलं आहे.

काँग्रेस पक्षातर्फे पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त गडचिरोलीत जिल्हा काँगेस समितीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Exit mobile version