अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली आहे. आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी ही माहिती दिली.
या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि पुस्तक खरेदीसाठी १४ हजार रुपये असे एकूण २६ हजार रुपये दिले जाणार आहेत. यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करत असलेल्या २५ अशा एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळेल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आणि प्रशासकीय सेवेत अनुसूचित जमातीमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढावं यासाठी ही योजना सुरु करायचा निर्णय घेतला असल्याचं पाडवी यांनी सांगितलं. ही योजना वर्ष २०२०-२१ पासून लागू होईल.
लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाणार आहे. मदतीची रक्कम थेट या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल असंही पाडवी यांनी सांगितलं.