सांगली, वाशीम आणि परभणी जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु होणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उद्यापासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करायचे निर्देश राज्य सरकारनं नुकतेच जारी केले होते. मात्र स्थानिक परिस्थिती बघून यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावा असंही सूचित केलं होतं. त्यानुसार स्थानिक प्रशासनांनी आपापल्या पातळीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबई यासारख्या राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या शाळा उद्यापासून सुरु नसल्या तरी सांगली, वाशिम आणि परभणी जिल्ह्यातल्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग मात्र उद्यापासून सुरु होणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात शाळा ४ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू केल्या जाणार नाहीत, असा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला.
देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं शाळा सुरू करव्यात किंवा नाही याविषयी पालक- शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात एकमत नव्हतं त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत. नववी ते बारावीचे प्रत्यक्षवर्ग सुरू होणार आहेत. प्रशासनाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यासाठी सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन आणि शाळांची लगबगही दिसू लागली आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या ७५० शाळा आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या दीड लाख विद्यार्थ्यांपैकी ४६ हजार ३२९ विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रं शाळांना प्राप्त झाली आहेत. ७५० शाळांमधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ४५६ इतकी आहे, त्यापैकी ४ हजार ९३५ शिक्षक, शिक्षकेतरांची कोरोना चाचणी झाली आहे.
उर्वरित सर्व शिक्षकांची चाचणी केली जाणार आहे. सांगली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६५० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात आता पर्यंतच्या माहितीनुसार ७ शिक्षकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात ५० हजार पालकांनी ऑनलाईन संमतीपत्रं दिली आहेत.
वाशिम जिल्ह्यातल्या शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग उद्यापासून नियमित सुरू होत असल्यामुळे या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आर टी पी सी आर ही कोविड-१९ ची चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाशिममधल्या आर टी पी सी आर चाचणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी दिसत आहे.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचं हमीपत्र, तोंडावर मास्क आणि सॅनिटायझर सोबत आणणं अनिवार्य आहे. परभणी जिल्ह्यात उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार सुरु करायचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
त्यानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्रानं शहरातल्या सर्व शाळा, महाविद्यालयामधल्या ६०५ शिक्षकांची कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.