मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या राज्यातल्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग काही जिल्ह्यांमध्ये आज सुरु झाले. कोरोनाबाबतच्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असून, मुंबई महानगरपालिका क्षेत्र, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच अन्य काही महापालिका क्षेत्रातल्या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यात पालकांची संमती पत्र घेऊन आज सुरू झालेल्या शाळांमधे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याकरता पालकांचे संमतिपत्र आवश्यक असून रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात सर्वाधिक ४०० विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतिपत्रे दिली आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग वर्ग आज पासून सुरू झाले असून शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत शाळांमधे शिकवणीला सुरुवात झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत आज सुरु झाले. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या उस्मानाबाद शहरातल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती आढळून आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा आजपासून सुरु होणार नाहीत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल संध्याकाळी दिले.
नांदेड जिल्ह्यातले ९ वी ते १२ वीचे वर्ग येत्या २ डिसेंबर पासून सूरू होणार असून जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घूगे यांनी काल याबाबतचे संयुक्त निवेदन जारी केले.
लातूर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व शाळा आज सुरू झाल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकरंडे यांनी सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयात दयानंद महाविद्यालयाचे वर्ग सुरु झाले असून केवळ १० टक्के पालकांनी आपल्या मुलांना पाठवण्याची संमती दिली आहे. तसेच शाळा सुरू करण्यासाठी १९ टक्के पालकांनी संमती दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता, जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचे दिसून आले.