नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत असून, अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते.
संसदेच्या नव्या संरचनेत भारताच्या युवा विचारांचे प्रतिबिंब दिसत असल्याचे ते म्हणाले. १७व्या लोकसभेचा संसदेच्या आजवरच्या कार्यकाळातला सुवर्णकाळ मानला जाईल असे काम या काळात झाले असे मोदी यांनी नमूद केले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
खासदारांसाठी उभारलेल्या या ईमारतींमधे ७६ सदनिका आहेत. नवी दिल्लीत डॉक्टर बी. डी मार्गावरचे ८० वर्ष जुने ८ बंगले पाडून, त्याजागी बहुमजली इमारती बांधल्या आहेत. या इमारती पर्यावरणपूरक असून, त्यात एल ईडी लाईटसचा वापर, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जा यंत्रणेची सोय उपलब्ध करून दिली आहे.