मुंबईत समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथं नि:क्षारीकरण प्रकल्प राबवणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या प्रकल्पाचा कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
मनोरी इथल्या, २५ ते ३० एकर जागेत हा प्रकल्प उभारायचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत समुद्राचं २००एमएलडी खारं पाणी गोडं केलं जाईल.
हा प्रकल्प पूर्ण झाल तर, मुंबईत मे आणि जून महिन्यात करावी लागणारी १० ते १५ टक्क्याची पाणी कपात टाळता येणं शक्य होऊ शकेल. या प्रकल्पासाठी काल झालेल्या आढावा बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.