मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारने आज नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सुचनांनुसार नवी दिल्ली, राज्यस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून विमान तसेच रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. या चाचणीनंतर ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशाच प्रवाशांना आता महाराष्ट्रात प्रवेश करता येईल.
विमानाने प्रवास करताना महाराष्ट्रात पोचण्याच्या ७२ तास आधी, तर रेल्वेसाठी ९६ तास आधी ही चाचणी करावी लागेल. विमान प्रवासाच्या बाबतीत जे प्रवासी चाचणी न करता प्रवास करतील, त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथेच स्वखर्चाने ही चाचणी करावी लागेल.
यादृष्टीने विमानतळांवर कोरोना चाचणीसाठीची सोय करावी, तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होईल अशा व्यक्तींचे पत्ते आणि संपर्काविषयीची माहिती विमानतळ व्यवस्थापकांनी घ्यावी असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
कोरोना चाचणी न करता प्रवास केलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जावी आणि कोरोनाची लक्षणे नसतील अशांनाच राज्यात प्रवेश करू द्यावा असे राज्य सरकारने सांगितले आहे. या नियमांनुसार ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील अशांची रेल्वे स्थानकांवर अँटीजेन चाचणी केली जाईल. अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील, या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावी लागेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
या चार राज्यांमधून रस्ते मार्गाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांकरता प्रवासापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक नसली, तरी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची कोरोनाच्या लक्षणासंबंधी तपासणी करायचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी राज्याच्या सीमेवरच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना सरकारने केली आहे.
या तपासणीत लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटीजेन चाचणी केली जाईल. अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील, या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावी लागेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
या नियम आणि सूचनांचे पालन होईल याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.