मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर जिल्हा प्रशासनाने काल रात्री १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल जारी केले.
या काळात मंदिर परिसरासह शहरातली सर्व आस्थापने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान दोन दिवस संचारबंदी असल्याने नागरिकांनी काल खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती.
कार्तिकी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या मंदिरात उद्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. तर वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दांपत्य पवार यांच्यासह महापूजेत सहभागी होणार आहे.
आज सहा वीणेकरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड करण्यात आली. मूळचे वर्ध्याचे असलेले भोयर गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूर इथे विठ्ठल मंदिरात वीणा पहारा देत असल्याचे आमच्या वार्ताहराने कळवले.