मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले, मात्र आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यानुसार कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.ते काल वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सादरीकरणानंतर बोलत होते.
लॉकडॉऊन काळातही विभागानं एक लाख आठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले, ही चांगली बाब आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रं सुरू करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रं सुरू करावीत, समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांमधे नवीन रोजगार उपलब्ध होतील त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे नियोजन करावं, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.