नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये नव्याने यांत्रिकीकरण झालेल्या ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या चार देशांचा समावेश आहे.
भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक संवादात मोठी आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले. या परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘ज्यावेळी मी पॅरिसला गेलो होतो त्यावेळी ‘बेसिक’ संघटनेच्या अस्तित्वाविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. मात्र, ही संघटना केवळ टिकलीच नाही तर पर्यावरणविषयक चर्चेत एक महत्वाचा घटक बनली आहे. यावेळीही पॅरिस करारानंतरच्या स्थितीचा आम्ही बैठकीत आढावा घेणार आहोत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या चिली येथे होणाऱ्या पुढच्या अधिवेशनात काय भूमिका घ्यायची याचा निर्णयही या बैठकीत होईल.’
पॅरिस कराराच्या अटी आणि जबाबदाऱ्यांचे पालन विकसित राष्ट्रे देखील करतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.