नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 च्या रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक अतुलनीय नेता आणि उत्तम संसदपटू गमावला आहे.
शोकप्रस्तावाचा मसुदा पुढीलप्रमाणे-
14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणातील अंबाला येथे जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. कानपूर येथील कृषी विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देखील प्रदान केली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करायला सुरुवात केली.
सुषमा स्वराज यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1977 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि हरियाणा राज्य सरकारमध्ये श्रम आणि रोजगार खात्याच्या कॅबिनेट मंत्री बनल्या. 1987 ते 1990 या काळात त्या पुन्हा हरियाणा विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आणि शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्या.
1990 मध्ये, त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि 1996 मध्ये 11 व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्यावर त्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या. कॅबिनेट मंत्री असताना. 1998 मध्ये, त्या पुन्हा 12 व्या लोकसभेवर निवडून गेल्या आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदाबरोबरच दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही पहिला. ऑक्टोबर 1998 मध्ये, त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर, एप्रिल 2000 मध्ये, त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून गेल्या आणि सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले . त्यानंतर जानेवारी 2003 ते मे 2004 पर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि संसदीय कार्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवले. एप्रिल 2006 मध्ये त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून गेल्या .2009 मध्ये, त्या 15 व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या आणि डिसेंबर 2009 ते मे 2014 पर्यंत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. 2014 मध्ये, त्या 16 व्या लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी मे 2014 ते मे 2019 पर्यंत परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिले.
सुषमा स्वराज त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्व कौशल्यामुळे आणि प्रेमळ स्वभावासाठी नेहमीच लक्षात राहतील. त्या एक सक्षम प्रशासक आणि माणुसकी असलेल्या एक प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांनी परदेशात संकटात सापडलेल्या भारतीयांना मदत करून सर्वांची मने जिंकली. या गुणांमुळेच त्यांना 2017 मध्ये अमेरिकेच्या दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने “भारताची सर्वात आवडती राजकीय व्यक्ती ” घोषित केले गेले.
मंत्रिमंडळाने सुषमा स्वराज यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करून देशासाठी केलेल्या सेवेची प्रशंसा केली आहे. मंत्रिमंडळ सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने शोकाकुल परिवाराप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत आहे.”