देशाचा कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६८ टक्के
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६८ टक्के इतका असून, गेल्या २४ तासांत एकूण ४१ हजार ४५२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८७ लाख ५९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या, देशात ४ लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे पाहता, एकूण बधितांपैकी ४ पूर्णांक ८७ टक्के रुग्ण उपचार घेत असून, उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. गेल्या २४ तासांत, ४१ हजार ३२२ नव्या रुग्णांची भर पडली असून, एकूण बधितांची संख्या ९३ लाख ५१ हजारांवर पोहोचली आहे.
दरम्यान, बाधित क्षेत्रांत आवश्यकतेनुसार कोविड चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, बाधित रुग्णांचा शोध, तात्काळ आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रिमुळे मृत्यू दरात घट होऊन, रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
जागतिक आकडेवारीत कमी मृत्युदर असणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश असून, आजघडीला भारतातील कोविड मृत्यू दर १ पूर्णांक ४६ टक्के असा आहे. गेल्या २४ तासांत, कोविड-१९ मुळे ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार २०० रुग्ण दगावले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ११ लाख ५७ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण १३ कोटी ८२ लाख इतके नमुने तपासण्यात आले आहेत.