नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी यांनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबादेतल्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या तीन संस्थांना भेट दिली.
सध्याच्या काळामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष कोविडविरोधी लस कधी येणार, याकडे लागले आहे, अशावेळी प्रधानमंत्रींनी या लस निर्मिती करणाऱ्या संस्थांना भेट दिली. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली, याबद्दल संशोधकांनी आनंद व्यक्त केला.
प्रधानमंत्र्यांच्या या भेटीमुळे आमच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि आमचे मनोबल वाढविण्यासाठी मदत मिळणार असल्याची भावनाही संशोधकांनी व्यक्त केली.
स्वदेशामध्ये लस विकसित करण्यासाठी इतक्या कमी कालावधीमध्ये, वेगाने केलेल्या प्रगतीबद्दल अभिमान वाटत असल्याचे प्रधानमंत्रींनी सांगितले. तयार होत असलेली लस सर्वांपर्यंत वितरित करण्यासाठी अधिक सुयोग्य प्रक्रियेची शिफारस करण्यात यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
या लसीसंबंधी नियामक प्रक्रियेमध्ये आणखी कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, याविषयी शास्त्रज्ञांनी अगदी मोकळेपणाने आणि स्पष्ट, विनासंकोच मते मांडावीत, असे आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केले.
कोविड-१९ विरोधात अधिक ताकदीने लढा देण्यासाठी नवीन आणि पुन्हा वापरता येण्यायोग्य औषधे कशी विकसित करण्यात येत आहेत, यासंबंधीच्या अभ्यास आढाव्याचे सादरीकरण शास्त्रज्ञांनी केले.
अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्कला प्रधानमंत्रींनी काल भेट दिली. इथे झायडस कॅडिला या संशोधन आणि औषध निर्माण कंपनीने डीएनएवर आधारित स्वदेशी झायडस बायोटेक पार्कमध्ये लस निर्मितीचे काम सुरू आहे.
झायडसच्या टीमकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा. या प्रवासामध्ये सरकारचा सक्रिय सहभाग असून आवश्यक असणारा सर्व पाठिंबा सरकारकडून देण्यात येईल’’, असे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
यानंतर प्रधानमंत्रींनी हैद्राबादच्या भारत बायोटेक या लस सुविधा केंद्राला भेट दिली. भारत बायोटेकमध्ये कोविड-१९ विरोधी स्वदेशी लस निर्मितीच्या प्रगतीविषयी माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी केलेली प्रगती जाणून घेऊन, त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आयसीएमआरबरोबर भारत बायोटकची टीम कार्यरत असून संस्थेने लस निर्मितीसाठी वेगाने प्रगती साधली आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधानांनी भेट दिली, त्यावेळी सिरममधील लस उत्पादनाशी संबंधित लोकांशी संवाद साधला. लस निर्मिती आणि उत्पादन वाढीसाठी आखण्यात आलेल्या योजनेची त्यांनी माहिती घेतली. तसेच लस वितरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या योजनेचा तपशील प्रधानमंत्रींनी जाणून घेतला.
सिरम संस्थेमध्ये नोवावॅक्स कोविशिल्ड लस तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.