नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या मागे कमी आहे. ही संख्या सध्या सरासरी ९९ अशी आहे.
विशेष लक्ष केंद्रित करून राबवलेल्या अभियानाद्वारे मृत्यूदर कमी ठेवण्याचे प्रभावी प्रबंधन करण्यात आले असून, हा आकडा ५०० पेक्षा कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंलत्रालयाने सांगितले.
देशभरात काल ३८ हजार ७७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे देशातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ लाख ३१ हजाराच्या पुढे गेली आहे.
काल देशभरातले ४५ हजार ३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९३ पुर्णांक ८१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. आत्तापर्यंत देशभरातले ८८ लाख ४७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात काल ४४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३७ हजार १३९ झाली आहे. सध्या देशाचा कोरोनामृत्यू दर १ पुर्णांक ४५ शंतांश टक्के इतका आहे. देशभरात सध्या ४ लाख ४६ हजार ९९२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान देशात आत्तापर्यंत एकूण १४ कोटी ३ लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ८ लाख ७६ हजारापेक्षा जास्त चाचण्या कालच्या दिवसभरात झाल्या अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.