Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे. ३२ शेतकरी संघटनांचे ४० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही बैठक सध्या सुरु आहे.तत्पूर्वी यासंदर्भात आजही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात बैठक झाली.

देशात नव्यानं लागू करण्यात आलेले कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हित समोर ठेवूनच करण्यात आले असून, त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले असल्याचं कृषी मंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका, हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे.

Exit mobile version