मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाद्वारे विविध आवास योजना राबविण्यात येत असून गोर गरिबांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून मोर्शी वरुड तालुक्यातील आदिवासी बांधवासह इतरांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी वरुड मोर्शी या दोन तालुक्यातील नागरिकांसाठी सुमारे 5 हजार 501 घरकुलांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे त्यामुळे वरुड तालुक्यातील 3069 घरकुल, मोर्शी तालुक्यातील 2432 घरकुल असे एकूण 5501घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज बैठकीत दिली. गोरगरीबांचे घरकुलाची कामे ही गुणवत्तापूर्ण दर्जेदार व्हावीत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वरुड मोर्शी तालुक्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी पंचायत समिती सभापती निलेश मगर्दे, ऋषिकेश राऊत, मोर्शी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र जिचकार, अतुल उमाळे, हितेश साबळे, विलास राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष रुपेश वाळके, अजय चोरडे, हितेश उंदरे, गृह निर्माण अभियंता, गृह निर्माण अभियंता अक्षय डहाके, प्रसाद जड, पंकज जैस्वाल, पवन कदम, अंकुरअंधारे, रोशन दंडाळे, भारती साहेब, जि टी तिवाले, कु देशमुख, प्रणिता ठाकरे गृह निर्माण अभियंता, आशिष वासनकर, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, राज्यातील गोरगरीबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनाव्दारे विविध आवास योजना राबविण्यात येते. परंतू, योजनेची अपुरी माहिती तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येतात. यामुळे योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. यावर मात करण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक गावात शिबिर घेऊन पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्रांची पूर्तता करुन घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
वरुड मोर्शी तालुक्यातील आदिवासी बहुल गावातील आदिवासी बांधवांना ठक्कर बाप्पा योजनेतून घरकुल दिले जाते. तर इतर संवर्गाच्या नागरीकांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदीच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. यापुढेही वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक संवर्गातील शेवटच्या घटकाला घरकुल मिळण्यासाठी जातीनिहाय सर्वेक्षण करुन लाभ दिला जाईल, असेही आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीत सांगितले.