Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर मोठ्याप्रमाणात विसंबून आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विशेषतः पुण्याच्या बाजारपेठेत बासमती तांदळाचा व्यापार अस्थिर होऊ लागला आहे. घटलेली आवक, वाढलेल्या किमती  आणि माल वाहतूकदारांची मनमानी अशा तिहेरी झळा पुण्याच्या बाजारपेठेला बसत आहे.

पंजाब हरियाणा मध्ये या हंगामातलं नवीन पीक आले आहे. मात्र त्यांची कापणी करायला शेतकरीच नाहीत. एकट्या पुण्याच्या बाजारात दर दिवसाला बासमती आणि इतर जातीच्या तांदळाची २० ट्रक आवक होत असते. मात्र आता आंदोलनामुळे ही आवक १० ट्रक पर्यंत खाली आली असून बाजारात वेळेवर माल पोहोचत नाही.

बासमती तांदळाचा क्विंटलचा दर सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. भाव १२ ते १५ टक्यांनी वाढले आहेत. पुण्याच्या बाजारपेठेतून मुंबई वगळता राज्यात आणि काही अंशी परदेशातही माल जात असतो. मात्र आता आंदोलनामुळे आवक कमी झाली असून या दहा दिवसात तांदळाच्या भावात तेजी दिसते आहे.

आंदोलनामुळे पंजाबमध्ये शेतीमालाची अंतर्गत वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा शेतीमाल बाहेरच्या राज्यांना मिळत नाही अशातच मालवाहतूकदाराकडून चढ्या दरानं शेतीमाल पुण्यात उतरवून घ्यावा लागत आहे.

जोपर्यंत आंदोलन शमत नाही तोपर्यंत ग्राहकांना या तेजीचा सामना करावा लागणार आहे.

Exit mobile version