Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मनरेगा अंतर्गत यंदा राज्यात विक्रमी फळबाग लागवड

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत यंदा राज्यात आत्तापर्यंत  विक्रमी फळबाग लागवड झाली असून, या लागवडीसाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत बाकी असल्यानं लागवडीखालील क्षेत्र आणि पर्यायानं फळांच्या उत्पादनातही भरघोस वाढ अपेक्षित आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग योजनेकडे वळू लागला असून आत्तापर्यंत राज्यातील सुमारे साडे सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे .

गेल्या ५ वर्षातील हा उच्चांक मानला जातो. गेल्या वर्षी सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रावर ही लागवड झाली होती. यंदा सर्वाधिक म्हणजे ११ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झाली असून सुमारे ५ हजार हेक्टरवर काजू लागवड झाली आहे. याशिवाय अडीच हजार हेक्टरवर संत्रा , १६०० हेक्टरवर सीताफळ आणि १२०० हेक्टरवर मोसंबी लावण्यात आली आहेत.

डाळिंब , पेरू आणि नारळाचीही प्रत्येकी साडेसहाशे हेक्टरवर लागवड झाली आहे. सुमारे साडे बाराशे हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबू लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर फायदे असल्याचं राज्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंच मोठ्या संख्येनं शेतकरी या योजनेत सहभागी  होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Exit mobile version