Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद ; सामान्य जनजीवनावर परिणाम नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अनेक ठिकाणी दुकानं बंद असली तरी सामान्य जनजीवन या बंदमुळे बाधित झालेलं नाही.

मुंबईत रेल्वे आणि बससेवा सुरु असल्यानं. जनजीवन सुरळीत सुरु आहे.  संवेदनशील क्षेत्रात सुरक्षेचा उपाय म्हणून बेस्ट बसगाडयांच्य़ा खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मुंबईत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आजच्या भारत बंदमध्ये नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या फळ, भाजीपाला, धान्य, कांदा- बटाटा, मसाला या पाचही बाजारांमधले व्यापारी, माथाडी, मापाडी सहभागी झाले आहेत. यामुळे या पाचही बाजारांमध्ये कृषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, राष्ट्रवादी या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मालाड रेल्वे स्थानक आणि मालवणी इथं निदर्शनं केली. मालवणी प्रवेशद्वार क्रमांक ७ इथून मंत्री अस्लम शेख मालाडला जाण्यासाठी निघाल्यावर पोलिसांनी आन्दोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर काही वेळ आन्दोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

लालबागमध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्षानं कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागात फिरून दुकानं बंद करण्यासाठी आवाहन केलं. लालबागचा बाजार बंद असून परिसरात काळाचौकी पोलीस ठाण्यानं चोख बंदोबस्त ठेवला आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी एसटी, बाजार सुरू आहेत. मात्र कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे.. खालापूरमध्ये रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. बंद शांततेत सुरु असून कुठंही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही.

सोलापूरमध्ये भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली  मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी सेना, आणि शिवसेनेचे सर्व पादाधिकारी उपस्थित होते.

भारत बंदला नागपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुर्व नागपूरातल्या कळमना मार्केटयार्डातली  बहुतांश दुकानं आज बंदच आहेत. शहरात कॉग्रेस, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन सेना ,वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थानिक पातळीवर भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत. रस्त्यावर   वाहतूक सुरळीत चालू असून कोणताही अनुचित प्रकार  घडू नये यासाठी नागपूर शहर पोलिसांनी  बंदोबस्त लावला आहे.

अकोला जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात धिंग्रा चौक इथं, केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या प्रतींचं दहन केलं. महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तरीत्या शहरात रॅली काढून  व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन केले. या बंदला व्यापार्यांानी संमिश्र प्रतिसाद दिला.

सातारा जिल्ह्यात बाजारपेठा पूर्णपणे बंद असून किरकोळ स्वरूपात खाजगी वाहतूक सुरू आहे. बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

जळगावमधे लोकसंघर्ष मोर्चा आणि कामगार संघटना सयुंक्त कृती समिती, रिक्षाचालकांची संघटना, हमाल मापडी संघटना, सर्व पुरोगामी संघटना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादी पक्ष, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी बंदचं आवाहन केलं होतं. सकाळी टॉवर चौकात एकत्र जमले.

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी पुत्र संघर्ष समिती आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यवतमाळच्या बसस्थानक चौकात सकाळी एकत्रित आले. त्यानंतर बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मोर्चेकऱ्यांनी नागपूर- तुळजापूर राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखून धरला. आंदोलकांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, देवानंद पवार, सिकंदर शहा, प्रवीण देशमुख आदी नेते सहभागी झाले.

बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी ७ च्या सुमारास चेन्नई- अमदाबाद ही रेल्वेगाडी रोखून धरली. यावेळी रविकांत तुपकर  आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलिसानी २० ते ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. येत्या ३ दिवसांत कायदा रद्द केला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

वाशिम जिल्ह्यात शेती विषयक  व्यापार आणि दुकान बंद आहेत.  जिल्ह्यातल्या हमाल- माथाडी कामगारांनी या बंदला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी कँग्रेस आणि शिवसेनेनं  रास्ता रोको आंदोलन केलं.

गडचिरोली इथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून आंदोलन केलं. गडचिरोली शहरातली सर्व दुकानं सकाळपासूनच बंद होती. गडचिरोली इथल्या इंदिरा गांधी चौकात सभा झाली. या सभेत विविध नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

भारत बंदला जालन्यात संमिश्र प्रतिसाद आहे. मुख्य बाजारपेठेतील काही दुकानं बंद तर काही दुकानं सुरु आहेत.

भारत बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रत्नागिरी व्यापारी संघानं संपाला पाठिंबा दिला होता. मात्र व्यापार्यांनी दुकानं बंद ठेवायची की व्यवसाय सुरू ठेवायचा, हे त्यांच्यावरच सोपवलं होतं. दरम्यान, रत्नागिरी बाजारपेठेतली दुकान बंद करायला भाग पाडणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकासह अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भारत बंदला नाशिक जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद असल्यानं कांद्यासह शेतमालाचे लिलाव होऊ शकले नाही. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतुन मुंबईला जाणारा भाजीपाला रात्रीपासूनच बंद करण्यात आला. आज संचालकांनी निदर्शनं केली. आज शहरातले भाजी बाजारही बंद आहेत. मात्र बस सेवा, शासकीय कार्यालयं, औद्योगीक क्षेत्रातले कारखाने सुरळीत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. महाविकास आघाडी, डावे पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं आज नाशिक जिल्ह्यात फेऱ्या काढून दुकानदारांना बंदचं आवाहन करण्यात आलं. कळवण तालुक्यात बाजारपेठ बंद आहे.

पेठमध्ये डाव्या पक्षांनी रास्ता रोको केलं. लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत इथं लिलाव बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांचे लिलाव ठप्प होते. उद्या पासून कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचवड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी कायद्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. मालेगाव इथंही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नंदुरबार शहरात आज भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. नवापूर तालुक्यातून बाईक रॅली द्वारे नंदूरबार शहरात दाखल होत मोर्चेकऱ्यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोर्चा ला सुरवात केली. यावेळी सुमारे दोन तासांहून अधिक काळ नेहरू चौकात घेराव घालत शेतकऱ्यांनी ठाण मांडत तीनही कायदे रद्द करण्याची मागणी केली. यानंतर पुन्हा बाईक रॅलीद्वारे जिल्हाधिकार्यालयात पोहोचत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याविरोधात आपले निवेदन दिलं.

Exit mobile version