भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग नियंत्रणविषयक केंद्रीय समिती यांनी आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांनी केले आणि म्यानमार दलाचे नेतृत्व समितीचे संयुक्त सचिव ब्रिगेडीअर जनरल विन न्यांग यांनी केले.
यावेळी, एनसीबी महासंचालक राकेश अस्थाना यांनी विविध विषयांविषयी माहिती दिली. तसेच हेरोईन, अम्फेटामाईन सारखे नशा वाढवणाऱ्या उत्तेजक पदार्थांच्या तस्करी चा मुद्दा काढला.म्यानमार च्या सीमेवर असलेल्या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये होणारी अंमली पदार्थांची तस्करी हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे अस्थाना म्हणाले. भारत- म्यानमार सीमेवर अनेक ठिकाणी छुप्या मार्गांनी ही तस्करी चालते. त्याशिवाय, बंगालच्या महासागरातून सागरी मार्गे होणारी तस्करी दोन्ही देशांसाठी आव्हान ठरली आहे. अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित सर्व माहिती म्यानमार च्या यंत्रणांना देण्यासाठी एनसीबी कटिबद्ध आहे, असे त्यांनी संगितले.
समितीचे संयुक्त सचिव ब्रिगेडीअर जनरल विन न्यांग यांनी ‘याबा’ या नव्या अंमली पदार्थांच्या गोळ्यांविषयी माहिती दिली. दोन्ही देशातल्या संस्थांमध्ये माहितीची देवघेव आणि इतर सहकार्य वाढले असतांनाही या नव्या अंमली पदार्थामुळे ही तस्करी पकडणे कठीण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ही तस्करी रोखण्यासाठी माहिती आणि तपासातील सर्व तपशिलांची देवघेव अधिकाधिक व्हायला हवी, अशी विनंती त्यांनी केली.
दोन्ही देशांमध्ये यासंदर्भातल्या गुप्तचर माहितीची देवघेव वेळोवेळी करण्याबाबत दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी या बैठकीत सहमती व्यक्त केली. सीमा आणि प्रदेश पातळीवरील अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जाव्यात, असेही यावेळी ठरले. दोन्ही देशांमध्ये झालेली घुसखोरी किंवा अवैध प्रवेशांविषयीची माहिती एकमेकांच्या यंत्रणांना सांगण्यावरही सहमती झाली.
दोन्ही देशांदरम्यान सहावी बैठक 2021 मध्ये होणार आहे.