पुनर्वसन, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वीज आदी विविध प्रश्नांवर चर्चा
कोल्हापूर : आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आज सर्व विभाग प्रमुखांची 2 तास आढावा बैठक घेतली. पूरग्रस्तांचे पुनर्वसन, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज जोडण्या, मदत निधी अशा विविध विषयांवर अत्यंत सूक्ष्म माहिती घेऊन भविष्यातील नियोजनाबाबत सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्वांचे स्वागत करून पूर परिस्थितीबाबत सद्यस्थितीचे संगणकीय सादरीकरण केले. ते म्हणाले, आजपर्यंत 162 टक्के पाऊस झाल्याने 43 फूट इशारा पातळी ओलांडून 55.7 फूट इतकी पंचगंगेची पातळी गेली. 321 गावांमध्ये 90 हजार 368 कुटुंबातील 3 लाख 58 हजार 91 सदस्यांची सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. 224 शिबिरांमध्ये 75 हजार 958 पूरग्रस्त दाखल झाले आहेत. 528 पाणीपुरवठा योजना बंद असून 169 पूर्ववत करण्यात आल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कृषी पिकाचे 1 लाख 5 हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे.
यावर श्री. परदेशी म्हणाले, उर्वरित 359 पाणी पुरवठा योजना पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती जास्त मदत द्या. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे हायड्रॉलिक पथक कोल्हापूरला पाठवतो. त्याचबरोबर कंत्राटदारही पाठवतो. सीएसआरमधून या योजना दुरूस्त करून घ्या. पुढील 10 दिवसात या योजना सुरू करून घ्या. महावितरणने सध्याची पूररेषा गृहित धरून आपले रोहित्र त्याचबरोबर उपकेंद्र योग्य उंचीवर स्थलांतरीत करावेत. उपकेंद्राच्या स्थलांतरणासाठी विकास आराखडा मंजूरी देताना विकासकांनी जागा दिली पाहिजे. अशी अट महापालिकेने घालावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
पुरामध्ये उभे असणारे ऊस पीक कुजलं आहे. सरासरी उत्पन्न धरून पीक कर्जमाफी द्यावी. अशी मागणी आमदार श्री. नरके यांनी यावेळी केली तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कर्जमाफीपेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे म्हणाले. प्रधानमंत्री किसान योजनेच्या माहितीच्या आधारावर सर्वेक्षण करून पंचनामा करा. पुनर्लागवडीसाठी लागणारा खर्च देऊ,असे श्री. परदेशी म्हणाले. भात शेती, सोयाबीन आणि भुईमूग यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत योग्य निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार श्री. महाडिक यांनी केली.
आरोग्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईमधून आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही कोल्हापूरसाठी पाठवला आहे. नागपूर, लातूर, यवतमाळ येथूनही आरोग्य पथके आली आहेत.
पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करून त्याबाबत दूषित स्त्रोत बंद करा. मुंबई महापालिकेचे फॉगिंग मशिन पाठवण्यात येतील,असे सांगून श्री. परदेशी पुढे म्हणाले, पूरग्रस्तांच्या घरांबाबत कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या अनुषंगाने पुररेषेच्या वरील जागा निवडावी. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गायरान जमिनीचा वापर करण्यात यावा. त्याचबरोबर काही ठिकाणी आहे ती घरे उंचावर बांधावी लागतील. पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करावी लागेल,अशी सूचना आमदार डॉ. मिणचेकर यांनी मांडली.
सांगली आणि कोल्हापूरसाठी वेगळं प्राधिकरण तयार कराव, अशी मागणी खासदार छत्रपती यांनी केली. तर विशेष आपत्ती म्हणून या भागाला निधीची तरतूद करावी,अशी मागणी आमदार श्री. नरके यांनी केली. पुढील 3 महिन्यात रस्ते दुरूस्ती करा. जे पुल पाण्याखाली होते त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करा. त्यासाठी किती निधी हवाय त्याची मागणी करा. यासाठी आयटीआय, इंजिनियर्स महाविद्यालय यांची मदत घ्या, अशा सूचनाही श्री. परदेशी यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना सबसिडीवर पंप दिले आहेत. त्याचा वापर फवारणीसाठी करावा, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. देशमुख म्हणाले, शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जास्तीत-जास्त कशी मदत करता येईल याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार चंद्रदिप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.