पंतप्रधानांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले आहे आणि त्यात समाजाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक समान उत्साहाने सहभागी होत आहेत असे प्रतिपादन पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केले. पेट्रोलियम उद्योग क्षेत्रात आयोजित स्वच्छता पंधरवड्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पेट्रोलियम उद्योग क्षेत्र जन आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाच्या प्रसाराला आणखी चालना देत आहे असे ते पुढे म्हणाले. पेट्रोलियम क्षेत्राने यासाठी अधिक प्रयत्नशील राहून स्वच्छतेच्या कार्याला वाहून घ्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
“भारत 2022 ला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहे, अशा वेळी आपण स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणलेच पाहिजे” असे ते पुढे म्हणाले. खासगी क्षेत्रातील तेल आणि वायू कंपन्यांनी स्वच्छ भारत अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा आणि देशातील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तसेच पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या प्रमुख पर्यटन स्थळी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी अत्याधुनिक शौचालयांची बांधणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘स्वच्छता पंधरवडा’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतील विविध कार्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी तेल आणि वायू क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना पुरस्कार प्रदान केले.
स्वच्छता ही सेवा 2019 आणि स्वच्छता पंधरवडा अभियानांतील उपक्रमांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि एकदा वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टीकचे निर्मुलन यांसह स्वच्छतेच्या विविध पैलूंविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विजेत्यांचे प्रधान यांनी कौतुक केले.