विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय कामकाजानंतर दुपारी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे सरकार निधी नाही असं सांगतं, तर दुसरीकडे आमदार, शिक्षण संस्था यांना भरघोस निधी देतं, असा आरोप भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात साहित्य उपलब्ध करुन दिलं नाही, आरोग्य विभागात नोकर भरती झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत या दोघांविरुद्धच्या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात नेमलेल्या विशेषाधिकार समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायच्या प्रस्तावावर खडाजंगी जाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला.
हा हक्कभंग विधानसभेशी संबंधित नाही,असं सांगक तो रद्द करण्याची मागणी भाजपा नेते मुनगंटीवार यांनी केली. यावर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान हा संपूर्ण राज्याचा अपमान असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
राज्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घेतले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावावरही विरोधी पक्षानं आक्षेप घेतला.
प्रथा परंपरा सोडून नेमणूक करता येत नाही दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या विचारांनी नेमणूक झाली पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस म्हणाले. यासंदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन फडनवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे हजारो तरुणांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. मुंबईत उपोषण सुरु आहे.
मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची धरपकड सुरु आहे, अशी आणीबाणिची स्थिती सरकारनं निर्माण केली आहे, असं फडनवीस म्हणाले. सरकार आरक्षण प्रश्नी समाजात फूट पाडत आहे, असा आरोप त्यांनी केला. ओबीसींच्या आरक्षणात कुणी वाटेकरी होणार नाही, असं सरकार का स्पष्ट करत नाही असा सवाल त्यांनी केला.