Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बालगृहातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम व्हावे – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई : बालगृहातून बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्य शासन यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे त्याला अशासकीय स्वयंसेवी संस्थांचेही (एनजीओ) चांगले सहकार्य लाभत आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित मानखुर्द येथील ‘बाल कल्याण नगरी’ या मुलींच्या बालगृहातील ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’तर्फे (आयजेएम) दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आलेल्या मुलींच्या निवासी इमारतीचे उद्घाटन ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त राहूल मोरे, मुंबई उपनगरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार, आयजेएमचे व्हाईस प्रेसिडेंट (दक्षिण आशिया) संजय मकवाना, डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स श्रीमती मेलिसा वालावलकर, चिल्ड्रेन एड सोसायटीचे मुख्याधिकारी विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या की, बालकांच्या संरक्षण आणि कल्याणासाठी राज्य शासन नवनवीन उपक्रम राबवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. ‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’च्या (जेजेआयएस) च्या डॅशबोर्ड व माहिती व्यवस्थापन पद्धतीद्वारे बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, बाल न्याय बोर्ड (जेजेबी) यांचे सनियंत्रण व संबंधित बालकाची नोंद व पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे संरक्षणाची आणि काळजीची गरज असलेल्या बालकांना वेळीच मदत मिळू शकणार आहे.

यावेळी ॲड. ठाकूर यांनी इमारतीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या सोयी- सुविधांची पाहणी करुन उत्कृष्ट काम झाल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी येथील मुलींचीही आस्थेने विचारपूस केली. येथे सुरक्षित वाटते का, जेवण चांगले असते का, निवासाची व्यवस्था चांगली आहे का आदी विचारपूस करुन मुलींच्या समस्या जाणून घेतल्या. ‘आयजेएम’च्या सहकार्यातून ही इमारत दुरुस्तीचे काम चांगले झाले असून इतरही बालगृहांमध्ये अशा सुविधा निर्माण करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल, असे त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी ॲड. ठाकूर यांनी चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) भेट देऊन तेथील कार्यशाळेची पाहणी केली. या आयटीआयच्या इमारतीची सुधारणा करण्यासह तेथे आजच्या काळाशी समर्पक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सध्याच्या काळात रोजगार मिळवून देणारी कौशल्ये येथील अभ्यासक्रमातून मिळाली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘बाल कल्याण नगरी’च्या प्रशासक श्रीमती माधुरी रामेकर यांनी केले. जिल्हा परीविक्षा अधिकारी निलकंठ काळे, परीविक्षा अधिकारी श्रीमती सपना यंदे आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version