नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या सुमारे ६० लाख टन अतिरिक्त साठ्याच्या निर्यातीवर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे, काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सहा हजार रुपये प्रतिटन या दराने अनुदानाच्या रकमेचा ५ हजार ३६१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता, आठवडाभरात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं.
पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसंच पाच लाख कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं, ते म्हणाले. यंदा देशात ३१० लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे, देशातली साखरेची मागणी २६० लाख टन राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं स्पेक्ट्रम लिलावाच्या पुढच्या टप्प्यालाही काल मंजुरी दिली. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. या संदर्भातली सूचना याच महिन्यात जारी होणार असून, लिलाव प्रक्रिया मार्च महिन्यात होणार आहे.