पिंपरी : आजच्या गतिमान जीवनात सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्येकाने फक्त जनजागृती अभियानापुरतेच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांनी केले. ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वाहतूक जनजागृती अभियानप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रत्येक वाहनचालकांनी आपली घरी कुणीतरी वाट पाहतंय या गोष्टीचा विचार करून स्वतःला घाई आहे म्हणून वाहन वेगाने चालविण्यापेक्षा, पहिले आपण असे न म्हणता आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवून इतरांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी, म्हणजे अपघात होण्याचे टाळता येईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शेफलर इंडिया लि. कंपनीच्या वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका पल्लवी सरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विद्यानिकेतन प्रशालेतील शालेय विद्यार्थ्यानी सादर केलेल्या बँडवादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी बोलताना पल्लवी सरकार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘यशस्वी’ संस्थेमार्फत औद्योगिक जगताला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे काम हे एका अर्थाने युवकांना राष्ट्रविकासात सहभागी करून घेण्याचे महनीय काम आहे. यावेळी रिटगेन इंडिया प्रा. लि. या कंपनीतील शिका व कमवा योजनेतील यशस्वी संस्थेच्या राहुल पौडवाल व प्रीतम डोरगे या विद्यार्थ्याना त्यांच्या कंपनीतील ऑन द जॉब ट्रेनिंगमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘यशस्वी’ संस्थेच्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी वस्तू स्वरूपात जमा करण्यात आलेली मदत स्वामी विवेकानंद केंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
तसेच पंपोर येथील दहशतवादी हल्ला परतवून लावताना शहिद झालेले भारतीय लष्करातील जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांसमवेत यावेळी ‘यशस्वी’ संस्थेतील सदस्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संस्थेच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील, संचालक संजय छत्रे, ऑपरेशन हेड कृष्णा सावंत, स्वामी विवेकानंद केंद्राचे अविनाश गोखले, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मेजर प्रताप भोसले यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन शर्मा यांनी, आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले.
यावेळी एल्प्रो चौकात रस्त्याच्या दुतर्फ़ा थांबून संस्थेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी वाहतूक जनजागृतीचे फलक हातात धरून वाहन चालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.