मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वन विभाग, वन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या २ दिवसीय “वाइल्डकॉन-२०२०” या ऑनलाईन परिषदेचं उद्घाटन नागपूरात आज झालं.
राज्यात 63 हजार चौरस.किमी. वनांचं क्षेत्र असून त्यामध्ये 1 हजार 23 प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त वावर असल्याची माहिती महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविकासासाठी विविध धोरणं राबवली जात असून राज्यातल्या १० जागांना नुकताच अभयारण्याचा दर्जा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्याच्या भ्रमण मार्गावर पर्यावरण स्नेही भुयारी मार्ग बांधणं, त्यांच्यासाठी तात्पुरती उपचार केंद्र तातडीनं बनवणं ही कामं सुरू असल्याचं ते म्हणाले. तृणभक्षी प्राण्यांना चारा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनानं ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
वन्यजीवांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी पशुवैदयकीय अधिकाऱ्यांची कायम स्वरूपी पदं भरणार असल्याचंही ते म्हणाले. या दोन दिवसीय आभासी परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र होणार असून सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.