मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गारठा वाढत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तिसऱ्या दिवशीही कायम असून आज पहाटेचं तापमान साडेपाच अंश सेल्सिअस इतकं होतं. शहर आणि जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढू लागल्यानं सकाळी सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
सकाळी १० वाजेपर्यंत नागरिक घराबाहेर पडेनासे झाले असून, रात्री तर नऊ वाजताच संचारबंदी सदृश्य चित्र दिसून येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात आज ८ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याने थंडी कायम आहे.
काल ८ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस अशी नोंद होती. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसात थंडीची लाट असून आज सकाळी १० अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. यामूळे थंडीचा कडाका वाढला आहे.
गावोगावी सकाळी नागरिक रस्त्यावर शेकोट्या पेटवत आहेत. यावेळी मुंबईतही हिवाळा चांगलाच जाणवू लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळी मुंबईकरांना कमालीचा गारवा जाणवत आहे. मात्र दुपारी कडाक्याचे ऊन सोसावे लागत आहे. आज सकाळी सात वाजता मुंबईचं तापमान २३ अंश सेल्सिअस होतं.
तर दुपारी बारा वाजता पारा २८ अंशावर आला. दुपारी २ वाजता ३१ अंशावर पोचला. संध्याकाळी ६ वाजता तापमानात पुन्हा घट होऊन पारा २९ अंशावर येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.