मुंबई: देशात लॉकडाऊन २४ मार्चला सुरू झाला. आज २४ जुलै. लॉकडाऊनला चार महिने पूर्ण झाले. या चार पैकी एप्रिल आणि मे महिन्यात फारच कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद व्हॉटसअप वर व्हायरल होत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते. किराणा, दूध आणि औषधं वगळून सर्व दुकानं बंद होती. या बंद दुकानांमध्ये पुस्तकांच्या दुकानांनाही कुलूप लागलेले होते.
*पुस्तक वाचक-ग्राहकांची कुचंबणा*
यातला चमत्कारिक भाग हा की नेमक्या या लॉकडाऊन काळात देशातले जवळपास सर्व वाचक घरात होते, आणि त्यांना वाचनासाठी भरपूर वेळही होता. स्वाभाविकच या काळात पुस्तके खरेदी करण्याची त्यांना इच्छाही होती, आणि निकडही होती. पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडावं तर पुस्तकाचं दुकान उघडं नव्हतं. हातात मोबाईल होता. त्यावरून ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर ऑर्डर द्यावी तर त्यांच्या कुरियरवाल्यांनाही डिलीव्हरीची परवानगी नव्हती. एप्रिल आणि मे हे दोन महिने वाचकांनी अशा वातावरणात काढले. पाण्याची तहान जशी सरबत पिऊन भागत नाही, तशी छापिल पुस्तकाची तहान ईबुक वाचून भागवता येत नाही. त्यामुळेच छापिल पुस्तकांच्या बाजारपेठेत जगभर आजही अब्जावधीची उलाढाल होत असते.
*मराठी पुस्तकांची भारतव्यापी बाजारपेठ*
जगभरात मराठी पुस्तकांचे प्रकाशन आणि विक्री यात पुणं हे सर्वांत आघाडीवर आहे. तिथला अप्पा बळवंत चौक म्हणजे मराठी पुस्तकाच्या बाजारपेठेची राजधानीच जणू. पण अप्पा बळवंत चौकातली एकूण एक पुस्तक दुकाने एप्रिल-मे मध्ये सलग साठ दिवस बंद होती. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट च्या ऑर्डर्स डिलीव्हरीलाही बंदी असल्याने मराठी पुस्तकं वाचणारांची एक प्रकारे उपासमारच चालू होती. मराठी पुस्तकांचा वाचक-ग्राहक फक्त पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्येच सिमित आहे असे कुणाला वाटेल. पण परिस्थिती तशी नाही. मी ‘संगणक प्रकाशन’ या ऑनलाईन पुस्तक वितरण संस्थेत व्यवस्थापन प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करीत आहे. माझा अनुभव आहे की नोकरी-व्यवसाय किंवा बदल्यांमुळे जी लाखो मराठी कुटुंबे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य करून आहेत त्यांना मराठी पुस्तकांची खरेदी करायची असते. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, तामिळ नाडू, केरळ सारख्या राज्यांतून सुद्धा मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन ऑर्डर्स वर्षभर सतत येत असतात. महाराष्ट्राबाहेरील या वाचक-ग्राहकांसाठी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन पुस्तक बाजारपेठा म्हणजे एक वरदानच आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशव्यापी कडक लॉकडाऊन मुळे मराठी वाचकांची पुस्तक-खरेदीची कुचंबणा महाराष्ट्रात तर झालीच, पण भारतभरही सर्वत्र झाली हे लक्षात घेतलं पाहिजे.
*लॉकडाऊन काळातला यशस्वी प्रयोग*
आमची ‘संगणक प्रकाशन’ ही संस्था, मराठीतील क्वचित एखादा अपवाद वगळता, सर्व प्रकाशकांच्या पुस्तकांचे वितरण आणि विक्री ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन बाजारपेठेत करीत असते. राजहंस, मौज, श्रीविद्या, रोहन, पद्मगंधा, ग्रंथाली, मनोविकास, शब्दालय, मनोरमा, समकालिन वगैरे ख्यातनाम प्रकाशनांबरोबर सुमारे शंभर लहान-मोठ्या प्रकाशकांची हजारो पुस्तकांची देश पातळीवरील उलाढाल एप्रिल आणि मे महिन्यात एकदम शुन्यावर आली. एकही पुस्तक या सलग ६५ दिवसात विकले गेले नव्हते. मे संपत आला तरी लॉकडाऊन उघडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नव्हती. फक्त ‘रेड झोन’ जाऊन त्या जागी ‘कंटेनमेंट झोन’ हे नवे नाव आले होते. कोरोना साथीमुळे सर्वत्र पसरलेले मृत्यूचे सावट आज जुलै महिना संपत आला तरी तसेच आहे. अजूनही बहुसंख्य प्रकाशकांची कार्यालये उघडलेली नाहीत. कुरियर सेवा कोलमडलेलीच आहे. सर्वत्र प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण आहे. मे अखेरीस तर बाहेर पडलेल्यांना नाक्यानाक्यावर अडवण्यात येत होते. अशा वातावरणात आम्ही एक प्रयोग करायचे निश्चित केले. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत १ जूनपासून सर्व मराठी प्रकाशकांची सर्व पुस्तके ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमचे कार्यालय अंबरनाथ येथे औद्योगिक वसाहतीत म्हणजे रेल्वे स्टेशन पासून सुमारे सहा-सात किलोमीटरवर आहे. लोकल गाड्या बंद. रिक्षाही जवळजवळ बंदच. काम करणारी माणसे कार्यालयात पोहोचणार ती चालत, सायकलवरून किंवा फार तर मोटरबाईक वरून. प्रयोग अवघड होता. मराठी पुस्तकांना ऑर्डर्स आणि मागणी किती येईल याचाही अंदाज येत नव्हता. पण तरीही आम्ही प्रयोग दामटण्याचे ठरवले. घरी बसलेल्यांना सायकल व मोटरबाईक वरून रोज कार्यालयात येण्याच्या सुचना दिल्या. दोनच माणसे आली. ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन ऑर्डर्स घेणे सुरू झाले. पहिल्याच दिवशी ऑर्डर्सचा पाऊस पडला. लक्षात आले की मराठी वाचकाला पुस्तकं वाचायला हवी आहेत. पुस्तकांची दुकाने बंद असल्याने त्याला घरबसल्या फक्त ऑनलाईन ऑर्डर देण्याचाच पर्याय उपलब्ध आहे. आश्चर्य म्हणजे भारतभरातून म्हणजे महाराष्ट्राबाहेरून आलेल्या ऑर्डर्सची संख्याही लक्षणीय होती. सर्व ऑर्डर्स पॅकींग होऊन तयार केल्या. प्रश्न होता तो कुरियर सेवेचा. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट. गाड्या सोडा, माणसंही कुठे दिसत नाहीत असा काळ. कुरियर साठी फोनवरून आमचा फॉलोअप सुरू झाला. फ्लिपकार्टने स्पष्ट शब्दात असमर्थता व्यक्त केली. फार फार तर तीन ऑर्डर्स उचलू असा त्यांचा एसएमएस आला. ऑर्डर्सचा तर खच पडलेला. लोकांना वाचायला पुस्तकं हवी होती. आगाऊ पैसे भरून ते ऑर्डर्स पाठवत होते. ॲमेझॉन व फ्लिपकार्ट त्यांना स्पष्टपणे सांगत होते की कोविद १९ मुळे डिलीव्हरीला १५ दिवस सुद्धा लागू शकतात. कॅश ऑन डिलीव्हरी बंद आहे. ॲडव्हान्स पेमेंट मस्ट आहे. तरीही भरभरून ऑर्डर्स लोक देत होते. कारण ते घरात होते, मोकळे होते, वेळच वेळ होता, त्यांना वाचायला पुस्तकं हवी होती. ॲमेझॉन च्या लॉजिस्टीक विभागाने अंबरनाथ वरून त्यांच्या ऑर्डर्स उचलण्यासाठी शिकस्त केली. ऑर्डर्स वाढत गेल्या, पण एक समस्या उभी राहिली. आमच्या गोडाऊनमधला माल संपत आला. काही पुस्तके शुन्यावर आली. पुस्तकच नाहीत तर पुरवठा कसा होणार? प्रकाशकांकडून पुस्तकांचा नवा स्टॉक हवा होता. पण चौकशी केल्यावर कळले की ग्रंथाली, मौज वगैरेंसारख्या मोठ्या प्रकाशकांची गेले अडीच महिने बंद असलेली कार्यालये अजून उघडलेलीच नाहीत. आता प्रकाशकांना साद घालायची होती. ते नाही म्हणाले तर आमचा प्रयोग ग्राहक वाचकांची मागणी असूनही फसणार होता.
*प्रकाशकांचा प्रतिसाद आणि सहकार्य*
मंडळी, कोरोनाची मृत्यूछाया पसरलेली असताना आम्ही धीर गोळा करून सुरू केलेला प्रयोग यशस्वी होणार की फसणार याचा निर्णय फक्त मराठी प्रकाशकांच्या हातात होता. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशन चे अवधूत जोशी म्हणाले मी सध्या फार थोडा वेळ ऑफिस उघडतो. पुण्याहून अंबरनाथला पुस्तकं पाठवायची कशी हा प्रश्न आहे. वाहतूक बंद आहे. ईपासशिवाय गाड्या सोडत नाहीत. पण तरी प्रयत्न करतो. ग्रंथालीचे सुदेश हिगलासपूरकर म्हणाले मी बोरिवलीला घरात अडकलेलो आहे. ग्रंथाली ऑफिस माटुंग्याला आहे. गेली दोन महिने उघडलेलं नाही. पुस्तकं असतील, पण ती मोजायला बांधायला माणसं नाहीत. अवघड आहे. पण प्रयत्न करतो. ग्रंथाली च्या धारप मॅडम म्हणाल्या पहाते जवळचं विश्वासाचं कोणी बाहेर पडून ऑफिस उघडायला तयार असेल तर चावी देईन. पण माटुंग्याहून अंबरनाथला पुस्तकं कशी नेणार तुम्ही?
प्रकाशकांची इच्छाशक्ती मोठी होती. कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा मनोमन निर्धार होता. पुण्याच्या श्रीविद्या, पद्मगंधा, अनमोल, रोहन वगैरेंनी पुस्तकांची पार्सल्स बांधून ती व्हीआरएल कुरियर कडे पुण्यात दिली. ती व्हीआरएल च्या अंबरनाथ डेपोत चार दिवसांनी पोहोचली. पुण्याचा प्रश्न सुटला. आता मुंबईसाठी ईपासचा टेंपो घेऊन मौज कडे विलेपार्ले, ग्रंथाली माटुंगा, राजा प्रकाशन, समकालिन प्रकाशन, मनोरमा प्रकाशन, अक्षर प्रकाशन हे दादर पूर्व पश्चिमेला, भालानी प्रकाशन परळ अशी आमची त्रिस्थळी यात्रा सुरू झाली. १ जुलै तारीख पाऊस अधून मधून हजेरी लावत होता. लॉकडाऊन मुळे जिकडे तिकडे बांबू लावून प्रतिबंधित क्षेत्र चे बॅनर दिसत होते. रस्ते बंद. मग टेंपो उलटा फिरवा असं करत करत सर्व पुस्तकांचे गठ्ठे गोळा झाले. यात टेंपो आणि धीर फक्त आमचा होता. खरा मोलाचा प्रतिसाद प्रकाशकांचा होता. मनोरमा प्रकाशन फडके मॅडम आणि त्यांची कन्या या दोन अत्यंत धीराच्या महिला चालवतात. त्यांच्याकडे पुस्तके माळ्यावरून काढायला, गठ्ठे बांधायला माणसे नव्हती. कार्यालय कम गोदाम तीन महिने उघडलेलं नव्हतं. त्या रहात होत्या तिथून कार्यालय वाहनाने वीस मिनिटे लागावी एव्हढं लांब होतं. पण त्यांनी कसलीही सबब न सांगता बांधलेले गठ्ठे आमच्याकडे दिले. समकालिन प्रकाशन कबूतरखान्याजवळ दादरला आहे. तिथे समोर टेंपो उभा केला तर पोलिस दटावायला आले. इथे टेंपो उभा करायचा नाही, साहेब येणार आहेत म्हणायला लागले. त्यामुळे टेंपो लांब उभा केला. पाऊस रिमझीमत होता. समकालिनच्या ऑफिसमधून त्यांचे धीरज साळवी पुस्तक गठ्ठा घेऊन पावसातून धावत लांबवरच्या टेंपोशी आले. अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत म्हणाले मीच गठ्ठा घेऊन चालत नाक्यावर येतो. आजूबाजूला सगळीकडेच नो एन्ट्री आहे. दुसरीकडे राजा प्रकाशन चे ज्ञानेश्वर मुळे आणि प्रसाद विचारे प्रतिबंधित क्षेत्राच्या शेजारून आम्ही टेंपो कुठून वळवावा याचे मार्गदर्शन करीत पुस्तकाचे गठ्ठे घेऊन आमची वाट पहात होते. मराठी पुस्तकांचा एकूणच प्रवास तसा खडतरच म्हणायचा. पण प्रकाशकांच्या इच्छाशक्तीमुळे तो प्रवास आणि आमचा प्रयोग दोन्ही यशस्वी झाले. जून आणि जुलै या लॉकडाऊन ग्रस्त महिन्यात आमच्या संगणक प्रकाशन संस्थेने सुमारे चार लाख रूपयांची मराठी पुस्तके ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर ऑनलाईन विकली. वाचकांना पुस्तके हवी होती ती मिळाली. प्रकाशकांच्या पुस्तकांना दोन महिन्यानंतर विक्रीचा शुभ योग आला. त्या निमित्ताने कितीतरी माणसांचे हात आमच्या प्रयोगाला लागले. सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. कहाणीत ‘साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हणतात. आमचा लॉकडाऊन मधला प्रयोग कोरोना ला हरवत हा असा सुफळ संपूर्ण झाला.