नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २२ हरित द्रुतगती महामार्गांच्या बांधकामांमुळे प्रवास आणि वाहतूक क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात कुटीरोद्योग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी पावले उचलत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातली गावं ‘स्मार्ट व्हिलेजेस’मध्ये परिवर्तित करण्यासाठी युवकांनी गावाकडे चलण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात यशवंतराव केळकर युवा पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते. कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनीष कुमार यांना गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
युवकांनी गावांमध्ये जाऊन व्यवसाय करा, त्यासाठी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग – एमएसएमई मंत्रालयाच्यावतीने सर्व ती मदत करण्यात येईल, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं.