मुंबई: लॉजिस्टिक टेक स्टार्टअप व्हील्सआय टेक्नोलॉजीने ५ लाखांहून अधिक फास्टॅग वापरकर्त्यांवर एक सर्वेक्षण केले. त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार भारतीय ट्रकिंग समूहाला चुकीच्या फास्टॅगच्या देवाण-घेवणीमुळे दररोज २-३ कोटी रुपये एवढे नुकसान सोसावे लागते. व्हील्सआयने दावा केला की दर चार फास्टॅगच्या व्यवहारापैकी एक चुकीचा असतो. त्यामुळे ट्रक मालक दररोज करत असलेल्या कठोर मेहनतीच्या उत्पन्नापैकी एक भाग गमावतात. फास्टॅग खात्यांतून दुप्पट किंवा चुकीची झालेली कपात स्वयंचलितरित्या ओळखून पैसे पुन्हा परत करण्याची सुविधा विकसित करण्याची प्रेरणा या सर्वेक्षणाद्वारे व्हील्सआयला मिळाली.
व्हील्सआयने प्रथमच अशा प्रकारची सुविधा बुधवार दिनांक १६ डिसेंबरपासून सुरू केली. या सुविधेत एआय आधारीत स्वयंचलित ओळख प्रक्रिया समाविष्ट असून ज्यांना अतिरिक्त शुल्क लावले गेले, त्यांना वापरकर्त्यांना पुन्हा पैसे वापस केले जातात. ही प्रणाली भारतातील सर्व फास्टॅग आधारीत टोल प्लाझांसाठी उपयुक्त ठरते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आयडीएफसी बँकसोबत मिळून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. प्रभावित ग्राहकांना दिलासा देत व्हील्सआयने स्वयंचलित ओळख आणि पैसे परत मिळण्याची सुविधा तर सुनिश्चित केली आहे शिवाय २१ दिवसांची ही प्रक्रिया केवळ ३ ते ५ दिवसांवर आणली आहे.
व्हील्सआय टेक्नोलॉजीचे प्रवक्ते सोनेश जैन म्हणाले की, ‘ई-टोल संकलन प्रणाली विकसनशील अर्थव्यवस्थांचे प्रतीक आहे. यात वेगाने व्यवहार होतात, गोंधळ रोखला जातो आणि अर्थव्यवस्थेत पैशांचा एक कार्यक्षम प्रवाह राखला जातो. नॉर्वे, इटली, जपान, अमेरिका, जर्मनीसारख्या देशांमध्ये १९६९ पासून ई-टोल संकलन प्रणाली आहे. मात्र भारताची सध्या सुरुवात आहे. सरकारने ही प्रणाली अनिवार्य केल्याने तसेच कोविड-१९ मुळे संपर्करहित टोल देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन मिळाले. परिणामी फास्टॅगचे चलनही वेगाने वाढते आहे. दरम्यान, भारताने मोठ्या प्रमाणावर फास्टॅग पद्धती स्वीकारली असून आपण एक गोंधळमुक्त आणि सुव्यवस्थित फास्टॅग अनुभवापासून खूप दूर आहोत.’