Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्याकडून कल्याणकारी निधीतून माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/ विद्यावेतन देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती/ विद्यावेतन हे दहावी ते पीएचडी करणाऱ्यांना मिळणार असून यासाठी विद्यार्थी किमान 60 टक्के गुणाने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

माजी सैनिक/ विधवा पत्नी यांनी मुंबई उपनगर येथील कार्यालयात, शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वत:चा अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज, पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्याबाबत शिक्षण संस्थेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची छायांकित साक्षांकित प्रत, माजी सैनिक कल्याण कार्यालयाने निर्गमित केलेले माजी सैनिक/ विधवा ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तक (पाल्याचे नाव असलेले पान) किंवा पार्ट टू ऑर्डरची छायांकित साक्षांकित प्रत, स्वत:च्या (माजी सैनिक/ विधवा) बँक पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे.

ज्या माजी सैनिक/ विधवा यांनी काही कारणाने त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष 2019-20 पूर्वी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळणेबाबतचे प्रकरण पहिल्या वर्षी सादर केलेले नाही त्यांना ज्या-त्या वर्षामध्ये म्हणजेच द्वितीय/तृतीय/चतुर्थ वर्षासाठी शिष्यवृत्ती वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार तत्कालीन देय असलेल्या दराप्रमाणे शिष्यवृत्ती मिळेल.एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशीरा झाला असल्यास प्रवेश दिनांकापासून एक महिन्याच्या आत अर्ज स्वीकारले जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 ऑक्टोबर 2019 पूर्वी अर्ज सादर करावेत असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version