Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असून ती कुणा एका पक्षाची वा नेत्याची खाजगी मालमत्ता नव्हे.

राष्ट्राच्या प्रती असलेलं आपलं दायित्व आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या, म्हणजेच ‘ईडीएफसी’च्या ‘न्यू भाऊपूर- न्यू खुर्जा’ या मार्गाचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला नवा  ‘न्यू भाऊपूर- न्यू खुर्जा’ मार्ग भारतीय रेल्वेच्या गौरवपूर्ण भूतकाळाला एकविसाव्या शतकाची नवी ओळख मिळवून देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं. ३५१ किलोमीटर लांबीचा ‘न्यू भाऊपूर- न्यू खुर्जा’ हा मार्ग तयार करण्यासाठी ५ हजार ७५० कोटी रुपये खर्च आला असून, तो तयार करण्यासाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.

याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते  ‘ईडीएफसी’च्या प्रयागराज इथल्या  नियंत्रण कक्षाचंही उद्घाटन करण्यात आलं. या कक्षातून ‘ईडीएफसी’च्या संपूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवलं जाईल. हे केंद्र जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नियंत्रण कक्षांपैकी एक आहे.

Exit mobile version